पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदी भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आलेला असतानाही बिनदिक्कत प्रवास करत आहे. नीरव मोदी याने १२ जून रोजी भारतीय पासपोर्टवर युरोस्टार हायस्पीड ट्रेनने लंडन ते ब्रसेल्स प्रवास केला असल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीने विमानाने प्रवास करणं टाळत रेल्वेने प्रवास केला. भारतीय अधिकाऱ्यांनी युरोपिअन इमिग्रेशनकडून ब्रसेल्सच्या प्रवासासाठी नीरव मोदीने वापरलेल्या पासपोर्टची माहिती मागवली आहे.

नीरव मोदी याचा पासपोर्ट २४ फेब्रुवारी रोजी रद्द करण्यात आला आहे. सीबीआयने ११ जून रोजी इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी विनंती केली आहे. नीरव मोदीविरोधात मुंबईतील विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर सीबीआयने ही कारवाई केली.

पासपोर्ट रद्द झाला असतानाही नीरव मोदी कसा काय प्रवास करत आहे असं विचारण्यात आलं असता परराष्ट्र मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हाला तपास यंत्रणांनी माहिती पुरवल्यानंतरच या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं’.

दरम्यान याआधी नीरव मोदीकडे तब्बल अर्धा डझन पासपोर्ट असल्याचे तपासात समोर आले होते. भारतीय तपास यंत्रणांना नीरव मोदी बेल्जियममध्ये असल्याचे समजले होते. तिथे त्यावेळी त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता. त्यानंतरही त्याच्याकडे ६ पासपोर्ट असल्याची माहिती मिळाली. यातील २ पासपोर्ट काही काळासाठी वापरात होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित ४ पासपोर्ट अजून वापरात नाही.

एका पासपोर्टवर नीरव मोदीचे पूर्ण नाव आहे. तर दुसऱ्यावर केवळ पहिलेच नाव आहे. यावर ४० महिन्यांसाठी ब्रिटनचा व्हिसा पण जारी करण्यात आला आहे. परंतु, सरकारने पासपोर्ट रद्द केल्यानंतरही नीरव मोदी एका देशातून दुसऱ्या देशात चकरा कशा मारतोय हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचा दुसरा पासपोर्टही रद्द करण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदेश मंत्रालयाने इंटरपोलला पासपोर्ट रद्द करण्याबाबत माहिती दिली होती. पण वेगवेगळ्या देशात समान व्यवस्था नसल्यामुळे नीरव मोदीला थांबवण्यात यश आलेले नाही. तो समुद्रमार्गे एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत असल्याचे सांगण्यात येते.

हा एक गुन्हा असून अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर नीरव मोदीवर आणखी एक गुन्हा दाखल केला जाईल. तसेच नीरव मोदी हा दुसऱ्या देशाने जारी केलेला पासपोर्ट तर वापरत नाही ना, याचाही तपास केला जाईल, असे या प्रकरणाशी निगडीत एका अधिकाऱ्याने सांगितले.