कर्नाटकचे माजी डीजीपी एचटी सांगलियाना आपल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरुत महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एचटी सांगलियाना यांनी निर्भयाच्या आईविषयी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं. बंगळुरु मिररने दिलेल्या वृत्तानुसार, माजी डीजीपी एचटी सांगलियाना यांनी निर्भयाची आई आशा देवी यांच्याबद्दल बोलताना म्हटलं की, ‘त्यांची शरिरयष्टी पाहिल्यानंतर निर्भया किती सुंदर असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो’. २०१२ मध्ये दिल्लीत निर्भयावर पाशवी अत्याचार करण्यात आले होते. मृत्यूशी तिने दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली होती आणि तिचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आशा देवी यांनी संघर्षमय कायदेशीर लढा द्यावा लागला. त्यांच्याबद्दल बोलताना एचटी सांगलिया म्हणाले की, ‘मी निर्भयाच्या आईला पाहू शकतो. त्यांच्याकडे किती चांगली शरिरयष्टी आहे. त्यांच्याकडे पाहूनच निर्भया किती सुंदर असेल याचा अंदाज लावू शकतो’.

एचटी सांगलिया इतक्यावरच थांबले नाहीत. पुढे ते म्हणाले की, ‘जर तुमच्यावर जबरदस्ती होत असेल तर तुम्ही आत्मसमर्पण केलं पाहिजे. नंतर तुम्ही ती केस फॉलो करा. सुरक्षित राहण्याचा, जीव वाचवण्याचा आणि हत्या रोखण्याचा हा पर्याय आहे’.

माजी डीजीपींचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना आश्चर्याचा धक्का बसला. या कार्यक्रमात बंगळुरुच्या प्रसिद्ध आयपीएस डी रुपादेखील उपस्थित होत्या. डी रुपा यांनी कार्यक्रमातील काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केले आहेत. कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्या अनिता चेरिया यांनीही डीजीपींचं वक्तव्य आपल्यासाठी खूप मोठा धक्का होता असं म्हटलं आहे. वक्तव्य ऐकल्यानंतर त्या अर्ध्यातून कार्यक्रम सोडून जाणार होत्या, पण निर्भयाच्या आई-वडिलांचा आदर म्हणून त्यांनी असं केलं नाही. एचटी सांगलिया यांच्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘जेव्हा पोलीस खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी जो एका प्रतिष्ठित पदावर होता त्याला असं वक्तव्य करणं शोभत नाही. असं असेल तर मग लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे’.

१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीत चालत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार झाला होता. या घटनेनंतर संपुर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. लोकांनी रस्त्यावर उतरुन न्याय देण्याची मागणी केली होती. पीडित निर्भयाचा २९ डिसेंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला.