नीती आयोगाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर आधारित विचारवंतांच्या गटाचे स्वरूप येणार असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी मंगळवारी येथे केला. नीती आयोगामध्ये मंत्री आणि भाजप समर्थक व्यक्तींचा भरणा आहे, त्यामुळे विचारवंतांच्या गटाचे त्याला स्वरूप येणार आहे, असे गोगोई यांनी ट्विट केले आहे.नियोजन आयोगाचे नामकरण नीती आयोग करणे हा पं. जवाहरलाल नेहरू यांचे राष्ट्रउभारणीतील कार्य कस्पटासमान असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. जनतेला नावाशी काहीही देणे-घेणे नाही तर त्याच्या कार्याची उत्सुकता आहे, नियोजन आयोगाचे नाव बदलणे ही क्षुल्लक युक्ती आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.