स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालायने पुन्हा एकदा नकार दिला. आसाराम बापूचा वैद्यकीय अहवाल येत नाही, तोपर्यंत त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी घेता येणार नाही. त्यामुळे तूर्ततरी आसाराम बापूला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने आसाराम बापूवरील उपचारासंदर्भात एम्स रुग्णालयाला वैद्यकीय समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. एम्सने १० दिवसांत अहवाल सादर करावे, असे न्यायालायने म्हटले होते. तर राजस्थान उच्च न्यायालयानेही आसाराम बापूला जामीन देणे अयोग्य असल्याचं मत नोंदवत जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
२०१३ मध्ये एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. जोधपूरमधील आश्रमात आसाराम बापूने अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. शेवटी ३१ ऑगस्ट २०१३ रोजी आसाराम बापूला पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून आसाराम बापू तुरुंगात आहेत. आसाराम बापूच्या सुटकेसाठी वकिलांनी वारंवार वैद्यकीय कारण दिले होते.