भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असली तरी मोदी यांना व्हिसा देण्याबाबत अमेरिकेने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आपल्या व्हिसा धोरणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
गुजरातमध्ये २००२ मध्ये उसळलेल्या दंगलींनंतर मोदी यांना, मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून २००५मध्ये प्रथम व्हिसा नाकारण्यात आला. मात्र ते अन्य कोणत्याही अर्जदाराप्रमाणे व्हिसासाठी अर्ज करू शकतात आणि अमेरिकेतील कायद्याच्या कसोटीला सामोरे जाऊ शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारी हार्फ यांनी स्पष्ट केले आहे.
नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे अमेरिकेच्या धोरणात काही बदल करण्यात आले आहेत का, असा सवाल हार्फ यांना विचारण्यात आला होता. एखाद्या विशिष्ट प्रकरणासाठी धोरणात बदल करण्यात आलेला नाही. मोदी यांना व्हिसा हवा असल्यास त्यांनी त्यासाठी अर्ज करावा आणि अन्य अर्जदारांप्रमाणे अमेरिकेतील कायद्याच्या कसोटीला उतरावे, असे हार्फ म्हणाल्या.
‘मोदी अर्ज करु शकतात’
अन्य कोणत्याही अर्जदाराप्रमाणे नरेंद्र मोदी व्हिसासाठी अर्ज करू शकतात आणि अमेरिकेतील कायद्याच्या कसोटीला सामोरे जाऊ शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारी हार्फ यांनी स्पष्ट केले आहे.
परदेशातील भाजपप्रेमींकडून अभिनंदन
 वॉशिंग्टन: गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाचे परदेशातील भाजपच्या मित्रांनी जोरदार स्वागत केले आहे.स्वत:ला भाजपशी संलग्न म्हणणाऱ्या आणि त्या पक्षाला पाठिंबा देणाऱ्या परदेशातील संघटनेने २० आणि २१ सप्टेंबर रोजी संघटनेच्या वार्षिक राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले असून त्याला मोदी उपग्रहाद्वारे संबोधित करणार आहेत. या परिषदेत मोदी  काय बोलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.