पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व आमदरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. तर, डाव्या पक्षांनी काँग्रेसला सोबत घेत ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर राज्यातील आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. तर, भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कुणाला पुढे केलं जाणार? हा सर्वांनाच प्रश्न पडलेला असताना, आता पश्चिम बंगालचे भाजपा प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का!, आमदार अरिंदम भट्टाचार्य भाजपात जाणार

“पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी कुणालाही समोर आणलं जाणार नाही. बहुमत मिळाल्यानंतर, पक्षाचं नेतृत्व व आमदार मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत निर्णय घेतील.” असं कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेस अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणुकी अगोदर आणखी एक धक्का बसला आहे. टीएमसीचा आणखी एक आमदार भाजपाच्या गळाला लागला आहे. शांतीपुरचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांचा आज दिल्लीमध्ये कैलाश विजवर्गीय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश होत आहे.

भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांना ममता बॅनर्जींनी ठणकावलं; म्हणाल्या…

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षांतर करणाऱ्यांना सुनावलं असून, “ज्यांना भाजपात जायचं आहे ते जाऊ शकतात, पण आम्ही त्यांच्यासमोर आपली मान झुकवणार नाही. राजकारण ही एक आदर्श विचारसरणी आहे, तत्वज्ञान आहे. आपण रोज कपडे बदलू शकतो, विचारसरणी नाही,” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच, ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपा माओवाद्यांपेक्षाही जास्त धोकादायक असल्याची टीकाही केली .