आगामी निवडणूक व्यक्ती केंद्रीत होणार नसून हिंसा आणि अहिंसा या दोन विचारधारांमध्ये ही निवडणूक होणार आहे, असे मत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. मुस्लिम समाजात धार्मिक तेढ पसरवण्याचे काम ओवेसी करत असून त्याला भाजपची साथ आहे, असा आरोप करत त्यांनी ओवेसी आणि भाजपवर सडकून टीका केली.  केंद्र सरकारवरचा अविश्वास ठराव मंजूर होणार नाही, हे काँग्रेसला माहिती होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

सोमवारी दिग्विजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. अविश्वास ठरावाबाबत ते म्हणाले, केंद्र सरकारवरचा अविश्वास ठराव मंजूर होणार नाही, हे काँग्रेसला माहिती होते. मात्र तुम्ही जी आश्वासने देऊन निवडून आला आहात, ती आश्वासने चार वर्षांनंतरही पूर्ण केली नाही. हे सांगणे गरजेचे होते. ते अविश्वास ठरावावेळी सांगता आल्याचे त्यांनी सांगितले.

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असून अनेक गोष्टी तातडीने शेअर करतात. त्यावर प्रतिक्रिया देतात. मात्र देशात दलित समाजावर होणाऱ्या अन्यायवर ते काही बोलत नाही. त्यांनी यावर मौन धारण केले असून या अत्याचारांना मोदींची मूक संमती असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काळा पैसा भारतात आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करु, दहशतवाद्यांना जशा तसे उत्तर देऊ, असे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी नोटाबंदी लागू केली. या निर्णयामुळे दहशतवादी कारवाईला आळा बसेल आणि भ्रष्टाचार नष्ट होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. पण यातील कोणताही दावा प्रत्यक्षात येऊ शकलेला नाही. याला नागरिक वैतागले आहेत. याचे परिणाम म्हणून मध्यंतरी झालेल्या राज्याच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळाले असून आता राजकीय वातावरणात बदल आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अविश्वास ठरावावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली. त्यावरून सत्ताधारी पक्षाकडून टीका केली जात आहे. याबाबत दिग्विजय सिंह म्हणाले, आजवर संसदेत भाषण झाल्यावर अनेक नेत्यांनी पंतप्रधानाची भेट घेतली आहे. मोदींना मिठी मारणे आणि संसदेतील सहकाऱ्याला डोळा मारणे या दोन गोष्टींचा संबंध नाही. यातून उगाच वाद निर्माण केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.