लोकसभेत मोदी सरकारविरोधात शुक्रवारी अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद मोदींनी ट्विट केले आहे. ‘आज संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. कोणत्याही अडथळ्याविना सविस्तर चर्चा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास शुक्रवारी मतदान होणार आहे. सत्ताधारी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असून केंद्र सरकारला धोका नसला तरी प्रादेशिक पक्ष कोणाला साथ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी शुक्रवारी सकाळी ट्विट केले. मोदी म्हणाले, आज संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे. माझे सहकारी खासदार अविश्वास प्रस्तावावर कोणत्याही अडथळ्याविना सखोल चर्चा करतील अशी आशा आहे. आपण जनतेला बांधील असून आज भारत या घडामोडीकडे लक्ष ठेवून आहे, असे मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, अण्णा द्रमुक, तेलंगण राष्ट्रीय समिती, बिजू जनता दल या मतदानात तटस्थ राहण्याची शक्यता असलेल्या प्रादेशिक पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला. त्यानंतर अण्णा द्रमुकने अविश्वास ठरावाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेनेबाबत संभ्रम कायम आहे.