CAA, NPR, NRC याबाबत देशभरात वाद सुरु असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी NPR बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. NPR साठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रं मागितली जाणार नाहीत असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रक्रियेत कुणालाही संशयित ठरलवं जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं. गुरुवारी ते राज्यसभेत बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. आपल्या देशातील मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जाते आहे असाही आरोप त्यांनी केला.

दिल्लीत CAA, NRC, NPR वरुन झालेल्या हिंसाचार प्रकरणात ७०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात तातडीने कारवाई केली जाते आहे. दिल्लीत हिंसाचार घडवण्यासाठी विदेशातून पैसे आणले गेले आणि ते दिल्लीत वाटले गेले असाही आरोप अमित शाह यांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याचीही माहिती त्यांनी राज्यसभेत दिली.

ज्या दंगखोरांनी दिल्लीत हिंसाचार माजवला त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी ४० पेक्षा जास्त तुकड्या तैनात केल्या आहेत. दंगलखोरांना ओळखण्यासाठी आम्ही आधार कार्डऐवजी व्होटर आयडी तपासण्यास सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत १९०० पेक्षा जास्त लोकांची ओळख पटली आहे. तसंच १२५ हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. २४ फेब्रुवारीच्या आधीच आमच्याकडे ही माहिती आली होती की दिल्लीत विदेशातून पैसे आले आहेत आणि काही मनसुबे पूर्ण करण्यासाठी ते वाटले गेले आहेत असंही अमित शाह यांनी स्पष्ट केलं.