पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घडवला असला तरी त्यामागे पाकिस्तानचा हात आहे असा स्पष्ट आरोप मंगळवारी भारतीय लष्कराने केला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाने प्रथमच पाकिस्तानची या हल्ल्यामध्ये भूमिका असल्याचा आरोप केला. भारतीय लष्कराने पत्रकार परिषद घेऊन काश्मीर खोऱ्यात पुलवामा येथे सोमवारी केलेल्या ऑपरेशनची माहिती दिली.

पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे जैश-ए-मोहम्मदवर नियंत्रण आहे. पाकिस्तानची या हल्ल्यामध्ये भूमिका होती याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही असे लेफ्टनंट जनरल ढिल्लॉन यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यामागे १०० टक्के पाकिस्तानी लष्कराचा हात आहे याबद्दल  माझ्या मनात कुठलीही शंका नाही असे ढिल्लॉन यांनी सांगितले.

जम्मू- काश्मीरमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरु शकतो. आम्ही राज्यातील सर्व मातांना विनंती करतोय की तुमची मुलं दहशतवादी मार्गाकडे वळली असतील तर त्यांना सुरक्षा दलांसमोर समर्पण करण्यास सांगा, असे सैन्याचे लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लॉन यांनी म्हटले आहे. जो हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच, असे ढिल्लॉन यांनी ठणकावले आहे. दहशतवादी हल्ला झाल्याच्या १०० तासांच्या आत आम्ही जैश- ए- मोहम्मदच्या काश्मीरमधील कमांडरचा चकमकीत खात्मा केला, अशी माहिती त्यांनी दिली.