बॉम्बस्फोटांच्या भीतीने दिल्ली मेट्रो फलाटांवर कचऱ्याच्या पेटय़ा ठेवण्यात आलेल्या नाहीत, असा युक्तिवाद करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाला (डीएमआरसी) दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले आहे. विमानतळे आणि रेल्वे स्थानकांवर कचऱ्याच्या पेटय़ा ठेवण्यात आलेल्या असताना महामंडळाने सुरक्षेबाबत अशा प्रकारचा केलेला युक्तिवाद अत्यंत क्षुद्र असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली मेट्रो स्थानकांवर पिकदाण्या आणि कचऱ्याच्या पेटय़ा ठेवण्याची व्यवहार्यता तपासून पाहावी इतकेच नव्हे तर प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी आणि शौचालये यांची व्यवस्था करण्यात आली आहे का, तेही पाहणे गरजेचे आहे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
विमानतळे आणि बस स्थानकांवर कचऱ्याच्या पेटय़ा नाहीत का, कचऱ्याच्या पेटय़ा न ठेवून तुम्ही प्रवाशांचे रक्षण करू शकणार आहात का, सुरक्षेबाबतचा हा युक्तिवाद अत्यंत क्षुद्र आहे, असे न्या. राजीव शकधर यांनी महामंडळाला खडसावले. मेट्रो स्थानकांवर किती शौचालये आहेत आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे की नाही आणि या सोयी प्रवाशांना सहज उपलब्ध होतात की नाही, या बाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही न्यायालयाने महामंडळाला आदेश दिले आहेत.
मेट्रोने प्रवास करणारे एक प्रवासी कुश कालरा यांनी स्थानकांवर पिण्याचे पाणी, शौचालये, कचऱ्याच्या पेटय़ा नसल्याबद्दल न्यायालयात दाद मागितली होती.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2015 रोजी प्रकाशित
दहशतवादाच्या भीतीमुळे मेट्रो स्थानकांवर कचरापेटय़ा नाहीत
बॉम्बस्फोटांच्या भीतीने दिल्ली मेट्रो फलाटांवर कचऱ्याच्या पेटय़ा ठेवण्यात आलेल्या नाहीत, असा युक्तिवाद करणाऱ्या दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाला (डीएमआरसी) दिल्ली उच्च न्यायालयाने चांगलेच खडसावले आहे.

First published on: 02-05-2015 at 04:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No dustbins at metro stations due to terror threat hc not convinced