नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून एक दिवसही सुट्टी घेतली नसल्याचे माहिती अधिकारांतंर्गत उघड झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून पंतप्रधानपदावरील व्यक्तीच्या रजेसंबंधी कोणते नियम आणि पक्रिया आखून देण्यात आल्या आहेत, याबद्दल विचारणा करणारा अर्ज काही दिवसांपूर्वी माहिती अधिकारांतंर्गत दाखल करण्यात आला होता.  भारताचे पंतप्रधान कधीच सुट्टी घेत नाहीत, ते कायम सेवा बजावत असतात, अशी माहिती या अर्जाच्या उत्तरादाखल देण्यात आली. या अर्जदाराने मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, एच.डी.देवेगौडा, आय.के. गुजराल, पी.व्ही. नरसिंह राव, व्ही.पी. सिंह आणि राजीव गांधी या माजी पंतप्रधानांनी घेतलेल्या सुट्ट्यांच्या तपशीलाचीही मागणी केली होती. मात्र, माजी पंतप्रधानांनी घेतलेल्या सुट्ट्यांची कोणतीही नोंद आपल्या कार्यालयाकडे उपलब्ध नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या दिनक्रमाचीही चर्चा व्हायला लागली होती. २८-२९ सप्टेंबरच्या रात्री जेव्हा पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक घडवून आणला, तेव्हा मोदींनी अख्खी रात्र जागून काढली आणि पाण्याचा घोटही न प्यायल्याचं म्हटलं जातं. २६ मे २०१४ रोजी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यानंतरच्या काळात नरेंद्र मोदी दिवसाचे १८ तास आणि आठवड्याचे सातही दिवस काम करत आहेत.