जम्मू-काश्मीरमधील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता, तेथून सुरक्षा दलास हटवण्याचा सध्यातरी केंद्र सरकारचा कोणताच विचार नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितले आहे. पाकिस्तान तेथील नागिरकांना भडकवण्याचे प्रयत्न करत असताना, आम्ही त्या तेथील सैन्य का माघारी बोलावू ? असेही रेड्डी म्हणाले.

याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री रेड्डी पीटीआयशी बोलताना सांगितले की, सध्या केंद्र सरकारचा जम्मू-काश्मीरची परिस्थिती पाहता तेथील अतिरिक्त सैन्यास माघारी बोलावण्याचा कोणताही विचार नाही. पाकिस्तान काश्मीरमधील नागरिकांना भडकवण्याचा व येथील परिस्थिती अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तो आंतरराष्ट्रीय समुदायाकडे येथील परिस्थितीबद्दल तक्रार करण्यासाठी पुन्हा जाऊ शकेल. अतिरिक्त जवानांना परत बोलावयचे की नाही, याबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडूनच घेतला जाईल. सरकार पाकिस्तानच्या कुरापती पाहता सावधतेचा पवित्रा घेत आहे. विरोधकांनी देखील हो गोष्ट लक्षात घेऊन सयंम बाळगायला हवा. पाकिस्तानची इच्छा आहे की जम्मू-काश्मीरमधील वातावरण अशांत व्हावे, जेणेकरून जगासमोर त्याला भारताने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मांडता येईल.

तसेच, रेड्डी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या स्थिती शांततापूर्ण आहे. शिवाय गृहमंत्री अमित शहा येथील परिस्थितीचा नियमित आढावा देखील घेत आहेत. येथील शाळा सुरू झाल्या आहेत, कलम १४४ हटवले आहे. सरकारी कार्यालयांमधील कामं सुरू झाली आहेत. काही जिल्हे सोडले तर संपूर्ण राज्यात इंटरनेट आणि टेलिफोन सेवा देखील सुरू करण्यात आलेली आहे.