अनुसुचित जाती-जमातींचे (एससी, एसटी) आरक्षण संपवण्याची ताकद कोणामध्येही नाही, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केले आहे. बिहारमधील गया येथे एका दलित कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते.

नितीशकुमार म्हणाले, न्याय आणि विकासाशी आमची प्रतिबद्धता असल्याने आम्ही आरक्षणाच्या बाजूने आहोत, न्यायासहित विकास याचा अर्थ समाजाच्या प्रत्येक भागाचा विकास होय. आपल्या देशात एससी-एसटीचे आरक्षण संपवण्याची ताकद कोणातही नाही. आरक्षणासाठी आम्ही बलिदान देण्यासही तयार आहोत.

काही लोक जनतेसाठी काहीही न करता आणि कोणताही निश्चित विचार न घेता राजकारणात येतात आणि बळ मिळाल्यानंतर आपल्या पदाचा दुरुपयोग करतात. काही लोक समाजात कायमच भ्रम आणि अडथळे निर्माण करण्याचे काम करीत असतात, असेही यावेळी ते म्हणाले.

नितीशकुमार पुढे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली जे संविधान सभेने स्विकारले. जर आरक्षण मिळालं नाही तर काठावर राहणारे लोक मुख्य प्रवाहात कसे येणार? जोपर्यंत मागासवर्गीय जनतेचा विकास होत नाही तोपर्यंत समाज, राज्य आणि देशाचा विकास होऊ शकत नाही.