काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपाविरोधात एक ट्विट केला आहे. हा ट्विट भाजपाला झोंबणारा असाच आहे. तुलसीराम प्रजापती, सोहारुबुद्दीन शेख, कौसर बी, जस्टिस लोया, हरेन पांड्या, प्रकाश ठोंबरे, श्रीकांत खांडलकर या सगळ्यांना कोणीही ठार केलं नाही, त्यांचा मृत्यू झाला अशा आशयाचा खोचक ट्विट राहुल गांधींनी केला आहे.

काय आहे प्रकरण?
सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा ठपका होता. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी सोहराबुद्दीनचे संबंध असल्याचा दावा गुजरात पोलिसांनी केला होता. नोव्हेंबर २००५ मध्ये सोहराबुद्दीनला गांधीनगरजवळ एका चकमकीत ठार मारण्यात आले. या बनावट चकमकीचे नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शाह यांचा सहभाग होता, असा आरोप होता. डिसेंबर २०१४ मध्ये न्यायालयाने अमित शाह यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते. तर तुलसीराम प्रजापती हा या प्रकरणातला मुख्य साक्षीदार होता. 2006 मध्ये तुलसीराम प्रजापतीचा चकमकीत मृत्यू झाला होता.

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांचीही याच प्रकरणात हत्या करण्यात आली. गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांनी पंड्या यांच्या हत्येचे कथित आदेश दिले होते असाही ठपका ठेवण्यात आला आहे. तर सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश बी.एच. लोया यांचा डिसेंबर २०१४ मध्ये नागपूरमध्ये मृत्यू झाला होता.

एका सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेलेले लोया यांचे १ डिसेंबर २०१४ रोजी हृदयविकोराच्या धक्क्याने निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या वेळची परिस्थिती आणि त्याचा सोहराबुद्दीन प्रकरणाशी असलेला संबंध याबाबत लोया यांच्या कुटुंबीयानी संशय व्यक्त केल्याचे वृत्त माध्यमांनी दिल्यानंतर हा मुद्दा गेल्या नोव्हेंबरमधे प्रकाशात आला होता. या सगळ्या प्रकरणांबाबतच राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. कारण सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला असून सर्व 22 आरोपींना सबळ पुराव्या अभावी दोषमुक्त करण्यात आले. त्याच संदर्भात राहुल गांधी यांनी हा ट्विट केला आहे.