उत्तर प्रदेशमधील करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. याच गोष्टीची दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली आहे. न्यायालयाने यासंदर्भात कठोर भूमिका घेत आदेश दिला आहे की कोणतीही व्यक्ती घरातून बाहेर निघताना मास्क न घालता दिसली तर तिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी. उत्तर प्रदेशमधील क्वारंटाइन सेंटर्सची परिस्थिती आणि कोविड १९ रुग्णालयांमध्ये मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहितयाचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला.

न्यायमूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि न्यायामूर्ती अजित कुमार यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणासंदर्भात बोलताना कोणत्याही नागरिकाने मास्क न घालता घराबाहेर पडू नये असं म्हटलं आहे. जर कोणी मास्क घालत नसेल तर तो संपूर्ण समाजाचा गुन्हेगार आहे, असंही न्यायलयाने म्हटल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

उत्तर प्रदेशमधील प्रत्येक पोलीस स्थानकातील पोलिसांच्या टास्क फोर्सने मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. घरीच आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या रुग्णांनाही आरोग्य सुविधा पुरवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक्स-रे आणि सीटी स्कॅनसाठी वेगळं रुग्णालय असायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ५०० राज्यात  (२४ सप्टेंबर २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार) ३१ हजार ५०० हून अधिक रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये आहेत. याचबरोबर न्यायलयाने उत्तर प्रदेशमधील डॉक्टरांनी सहानुभूतीपूर्वक पद्धतीने करोना रुग्णांवर इलाज करावा असं म्हटलं आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारपर्यंत (२४ सप्टेंबर २०२०) करोनाचे ३ लाख ८४ हजार २७७ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत पाच हजार ३६६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६१ हजारहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. गुरुवारी राज्यात चार हजार ६७४ नवे रुग्ण आढळून आले. तर ६७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यामधील करोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ८२.१९ असल्याचा दावा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.