नॅशनल हेराल्ड प्रकरणाच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा काँग्रेसचा आरोप मंगळवारी अरूण जेटली यांनी फेटाळून लावला. सरकारला या प्रकरणाशी काहीही देणेघेणे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाचे पडसाद मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे मंगळवारी दिवसभर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज होऊ शकले नाही. काँग्रेसने संसदेत घेतलेल्या या पवित्र्यावर टीका करताना सोनिया आणि राहुल यांनी न्यायालयाला सामोरे जावे असे अरूण जेटली यांनी सांगितले. संसदेत किंवा प्रसारमाध्यमांकडून दोषी किंवा निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी भारत हा काही ‘बनाना रिपब्लिक’ नसल्याचे यावेळी जेटली म्हणाले. यामध्ये कोणतेही सुडाचे राजकारण नाही. एक खासगी तक्रार दाखल करण्यात आली होती. सरकारला या सगळ्याशी काहीही देणेघेणे नाही. उच्च न्यायालयाने त्यांची (सोनिया आणि राहुल गांधी) याचिका नाकारली आणि त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. देशात कायद्यापासून कोणाचीही सुटका नाही. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी किंवा सुनावणीला हजर रहावे, असेही जेटली म्हणाले.