केंद्र सरकारच्य नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलानावरून देशातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं दिसत आहे. संसदेत काल झालेल्या गदारोळानंतर आज विरोधी पक्षांनी राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. अमेरिकन पॉप गायिका रिहाना व ग्रेटा थनबर्गसारख्या सेलिब्रिटींनीही या शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देत आंदोलनला पाठिंबा दर्शवला आहे. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली गेली आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कडक इशारा दिल्याचे दिसून आले आहे.

“खळबळ निर्माण करणारे…”; शेतकऱ्यांचे समर्थक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना मोदी सरकारचं कठोर शब्दांमध्ये उत्तर

“कोणताही अपप्रचार भारताचे ऐक्य धोक्यात आणू शकत नाही!, कोणताही अपप्रचार भारताला नवीन उंची गाठण्यापासून थांबवू शकत नाही!, अपप्रचार हा भारताचे भवितव्य ठरवू शकणार नाही, प्रगतीचं देशाचे भवितव्य घडवेल. प्रगती साधण्यासाठी भारताची एकजुट असून, सर्वजण त्यासाठी एकत्र आहेत.” असं ट्विट अमित शाह यांनी केलं आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकामध्ये सेलिब्रिटींनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यात आलं आहे. “खळबळ निर्माण करणारे सोशल मीडिया हॅशटॅग आणि वक्तव्यांच्या माध्यमातून लोकांना आकर्षित करण्याची पद्धत, खास करुन जेव्हा ही पद्धत लोकप्रिय व्यक्तींकडून वापरली जाते तेव्हा ती योग्य नसते तसेच ती बेजबदारपणा दाखवते,” असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. रिहानाबरोबरच ग्रेटा थनबर्ग, अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नातेवाईक असणाऱ्या मीना हॅरिस यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केलीय.