सीबीआयकडून टाकण्यात आलेल्या धाडींमुळे लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब अडचणीत आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोपांमुळे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना संयुक्त जनता दलाकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे. मात्र ‘तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही,’ असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुलाच्या बचावासाठी लालूप्रसाद यादव सरसावल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून तेजस्वी यादव यांच्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी चार दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. यावर लालूप्रसाद यादव यांनी भाष्य करत, तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले आहे. ‘बिहारची जनता, राष्ट्रीय जनता दल आणि महाआघाडीने तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री केले आहे,’ असे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे. तेजस्वी यादव यांच्यावर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दलाची बैठक घेतली. तेजस्वी यादव यांच्याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी ४ दिवसांचा अल्टिमेटम देण्याची भूमिका या बैठकीत घेण्यात आली.

‘माझ्या कार्यकाळात रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या कामाचे जगभरात कौतुक झाले. माझ्याविरोधात सीबीआय, ईडी, आयकर विभागाचा वापर करण्यात येतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी यासाठी कट रचला आहे. मला आणि माझ्या पक्षाला संपवण्यासाठी मोदी आणि शाह यांचे प्रयत्न सुरु आहेत,’ असे लालूप्रसाद यादव यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटले.

‘कुटुंबावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप चुकीचे असून सर्व गोष्टींचा हिशोब देण्यास आणि कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार आहोत. भाजपकडून नितीश कुमार यांना स्वप्ने दाखवली जात आहेत. भाजपकडून महाआघाडीला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ज्या हॉटेल निविदा प्रकरणात घोटाळा झाल्याचा आरोप तेजस्वी यादव यांच्यावर करण्यात येतो आहे, त्यावेळी तेजस्वी अल्पवयीन होता. भाजपकडून माझ्याविरोधात कारस्थान रचण्यात येते आहे,’ असेही लालूप्रसाद यादव यांनी म्हटले.