मार्च होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील दिल्लीतील सामन्यांना दिल्लीतील क्रिकेटप्रेमी मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फिरोजशहा कोटला मैदानावर होत असलेल्या सामन्यांसाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) कार्यकारी अध्यक्ष चेतन चौहान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला bcci लिहिले होते. मात्र, त्याला बीसीसीआयकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी या सामन्यांसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी डीडीसीएच्या पदाधिकाऱ्यांना ३१ जानेवारीची अंतिम मुदत दिली होती. ही मुदत उलटून गेली असली, तरी आवश्यक प्रमाणपत्रे डीडीसीएकडे आलेली नाहीत. त्यामुळेच दिल्लीत होणाऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. डीडीसीएच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, चेतन चौहान यांनी बीसीसीआयला पत्र लिहून दहा दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्या काळात आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवली जातील, असेही त्यांनी पत्रामध्ये म्हटले होते. पण बीसीसीआयकडून याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि अनुराग ठाकूर हे दोघेही आयसीसीच्या बैठकीसाठी दुबईमध्ये असल्याने त्यांच्याकडून या पत्राला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.