उत्तर प्रदेशमध्ये भलेही भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली तरी काशी विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला (अभाविप) पराभवाचा सामना करावा लागला आहे. नगरपालिका निवडणुकीपूर्वीच काशी विद्यापीठात झालेला पराभव भाजपसाठी मोठा हादरा असल्याचे मानले जाते. या निवडणुकीत अध्यक्षपदावर समाजवादी विद्यार्थी संघटनेचा बंडखोर विद्यार्थी नेता राहुल दुबे याने २३६५ मते मिळवत विजय मिळवला. राहुलने अभाविपचा वाल्मिकी उपाध्याय याचा कमी फरकाने पराभव केला. उपाध्यक्षपदावर विजय मिळवणारा रोशनकुमार हा समाजवादी आणि भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचा संयुक्त उमेदवार होता.

महामंत्रीपदावर अनिल यादवने विजय मिळवला. त्याने समाजवादी विद्यार्थी संघटनेला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्याशिवाय चौथ्या जागेवर समाजवादी व भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेचे संयुक्त उमेदवार रवी प्रताप सिंह याने विजय मिळवला. या निवडणुकीत अभाविपला मते चांगली पडली पण त्यांना एकही जागा मिळवता आली नाही. या पराभवामुळे अभाविपला आत्मपरीक्षण करावे लागेल. कारण अलाहाबाद विद्यापीठ, जेएनयू आणि दिल्ली विद्यापीठात अभाविपला पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीनंतर विद्यार्थ्यांमध्ये अभाविपचा पराभव कमी होत असल्याचे दिसून येते.

आता सर्वांच्या नजरा या आगामी नगरपालिका निवडणुकांकडे आहेत. राज्यात निर्विवाद वर्चस्व राखणारी भाजप नगरपालिका निवडणुकीत हेच यश कायम ठेवेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इतर पक्षांनीही या निवडणुका गंभीरपणे घेतल्या आहेत.