अमेरिका-दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायतींचा निषेध करण्यासाठी उत्तर कोरियाने शनिवारी क्षेपणास्त्र चाचण्या केल्या. अध्यक्ष ट्रम्प यांनीही संयुक्त लष्करी कवायतींबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी या चाचण्या केल्या. सोल येथे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन लघु पल्ल्याची आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ही ईशान्येकडील हामुहंग शहरातून सोडण्यात आली. ती ४०० कि.मी अंतर कापून कोरिया द्वीपकल्प व जपान यांच्या दरम्यानच्या सागरात कोसळली. दोन आठवडय़ात क्षेपणास्त्र चाचण्यांची ही पाचवी वेळ होती. या चाचण्या म्हणजे दक्षिण कोरिया व अमेरिका  यांच्या संयुक्त लष्करी कवायतींविरोधात इशारा असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले आहे. शनिवारच्या चाचण्या या लष्करी कवायतींनी किम यांचा असलेला विरोध अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी मान्य केल्यानंतर झाल्या आहेत. ट्रम्प यांचा कवायतींना असलेला विरोध लष्करी स्वरूपाचा नसून आर्थिक आहे. ‘किम जोंग यांचे एक सुंदर असे पत्र मिळाले असून ते सकारात्मक आहे. किम हे संयुक्त लष्करी कवायतींच्या विरोधात आहेत पण या कवायती मलाही पसंत नाहीत. त्यासाठी जपान व दक्षिण कोरिया यांच्याशी सल्लामसलत केली जात आहे.’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.