उत्तर भारतामध्ये अवकाळी पावसाचा धुडगूस
दिल्लीमध्ये ७१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
राजधानी दिल्लीसह उत्तर भारतामधील अनेक ठिकाणी मागील २४ तासांत जोरदार पाऊस झाला. दिल्लीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे तापमानाचा पारा खाली उतरला आहे. राजधानीतील अनेक भागांत गारा पडल्याचेही वृत्त असून या पावसामुळे मंगळवारी सकाळी वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला होता. शहरामध्ये मागील २४ तासांत ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यात झालेली ही सर्वाधिक पर्जन्यवृष्टी असून या पावसाने मागील ७१ वर्षांचा विक्रम मोडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. जम्मू काश्मीर व हिमाचलप्रदेशमध्येही मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी झाली असून जम्मू -श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या दर्शनाहून परतणाऱ्या टेम्पोला झालेल्या अपघातामध्ये पाच जण मृत्युमुखी पडले असून सात जण जखमी झाले आहे. काटराजवळील बेस कॅम्पजवळ हा अपघात झाला. अंधूक प्रकाश व निसरडा रस्ता यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज्यात पाऊस व बर्फवृष्टीमुळे सुमारे १० हजार प्रवासी ठिकठिकाणी अडकले आहेत. दिल्लीत झालेल्या पावसामुळे अनेक भागांतील वाहतूक  व्यवस्था विस्कळीत झाली होती. शहरात मंगळवारी किमान तापमान ११.७ अंश तर कमाल तापमान १९.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. आगामी काही दिवस अशाच प्रकारचे तापमान राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
जम्मू – श्रीनगर महामार्ग बंद
जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी व भूस्खलनामुळे जम्मू -श्रीनगर महमार्ग सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आला होता. या मार्गावरील पीर पंजाल परिसर, जवाहर बोगदा, बनिहाल परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात बर्फवृष्टी झाली. जम्मू- श्रीनगर महामार्ग हा काश्मीर खोऱ्याला देशाच्या अन्य भागांशी जोडणारा एकमेव महामार्ग आहे. हा महामार्ग बंद झाल्याने काश्मीर खोऱ्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर परिणाम झाला आहे.
राजस्थानमध्येही रिमझिम
 राजस्थानमध्ये पिलानी इथे सर्वाधिक १५.१ मिलीमीटर पाऊस पडला. तर अजमेरमध्ये १२.४, जोधपूरमध्ये ९.८ व जयपूरमध्ये ९.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. अचानक झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला. सिक्करमध्ये सर्वात कमी ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. राज्यातील बहुतेक शहरांत तापमानाचा पारा १० ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान होता.
उत्तराखंड विस्कळीत
उत्तराखंडमध्ये पाऊस, बर्फवृष्टी व त्यामुळे वाढलेला गारठा यामुळे सलग दुसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळीत होते. राज्यात टिहरीमध्ये सर्वाधिक ६१.८ सेल्सिअस पावसाची नोंद झाली. डेहराडून, मसुरी या राज्यातील प्रमुख शहरांतही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तापमान सरासरीपेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअस कमी झाले.