News Flash

मोकाट झुंडशाहीशी देशभर मूकलढा

दिल्ली-मथुरा रेल्वेगाडीमध्ये शुक्रवारी हरियाणाजवळ जमावाने जुनैद खान नावाच्या तरुणाची हत्या केली.

| June 29, 2017 02:02 am

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

निर्दयी आणि मोकाट झुंडशाहीकडून मुस्लीम आणि दलितांच्या वाढत्या हत्यांच्या निषेधासाठी दिल्लीत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘नॉट इन माय नेम’ या आंदोलनाचे लोण समाजमाध्यमांवरून अल्पावधीत पसरले आणि देशभरात विचारवंत, अभ्यासक, अभिनेते, कलाकार आणि सामान्य नागरिकांनी या झुंडशाहीचा जोरदार निषेध केला.

दिल्ली-मथुरा रेल्वेगाडीमध्ये शुक्रवारी हरियाणाजवळ जमावाने जुनैद खान नावाच्या तरुणाची हत्या केली. जागेवरून झालेल्या वादाचे पर्यवसान धार्मिक विद्वेशात बदलले आणि स्वयंघोषित न्यायकर्त्यांच्या थाटात जमावाने ‘गोभक्षक’ असल्याची संभावना करीत या तरुणाचा मृत्यू होईस्तोवर त्याला मारहाण केली. यासोबत या निर्दयी झुंडीने त्याच्या दोन्ही भावांचादेखील अपमान केला. देशामध्ये गेल्या काही महिन्यांत सुरू असलेल्या असहिष्णू वातावरणामध्ये आणखी एका भीषण हिंसेची नोंद झाली. सदसद्विवेकबुद्धी  गमावलेल्या झुंम्डीच्या या जगामध्ये माणुसकीचीही लाट येऊ शकते याचा पुरावा  ‘नॉट इन माय नेम’ या आंदोलनाने दिला.

दिल्लीस्थित सबा दिवाण या चित्रपटनिर्मातीने आपल्या फेसबुक वॉलवर तरुणाचे छायाचित्र टाकून केलेल्या पोस्टनंतर दिल्लीमधील जंतरमंतर येथे बुधवारी संध्याकाळी निषेधमोर्चा आखला गेला. मात्र त्याचा दुवा समाजमाध्यमावर इतका पसरला की देशभरातील दहा शहरांमध्ये तातडीने या मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांची फौज स्वेच्छेने उतरली. कोलकाता, अलाहाबाद, चंदिगढमधील सेक्टर १७, जयपूरमधील गांधी नगर, पाटण्यातील कारगील चौक, हैदराबाद, बेंगळूरुमधील टाऊन हॉल, मुंबईतील कार्टररोड, लखनौमधील गांधी पार्क, कोची आणि थिरूअनंतपूर आदी भागांत सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींनी या ‘नॉट इन माय नेम’ आंदोलनात सहभाग घेतला. गुरुवारी तो लंडन, अमेरिकेतील बोस्टन आणि कॅनडामधील टोरण्टो शहरात आयोजित करण्यात आला असून त्याचा परीघ आणखी वाढण्याची शक्यता आहे.

झुंडशाहीचे वास्तव.

तथाकथित गोरक्षकांच्या आणि विखारी मानसिकतेच्या झुंडींनी गेल्या सात वर्षांमध्ये देशभरात केलेल्या विविध हिंसक घटनांमध्ये ५१ टक्के मुस्लिमांना लक्ष्य करण्यात आल्याचे ‘इंडिया स्पेण्ड’ या अभ्याससंस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून दिसून आले.  ६३ घटनांमध्ये २८ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधानी विराजमान झाल्यानंतर यापैकी ९७ टक्के घटना घडल्या आहेत.  ६३ पैकी ३२ घटना या भारतीय जनता पक्षाचे सरकार असलेल्या राज्यात घडल्या आहेत. सात वर्षांच्या काळात देशातील ज्या २८ नागरिकांना समूहाच्या क्रौर्याचे बळी व्हावे लागले त्यातील २४ मुस्लीम आहेत.  १२४ नागरिक हल्ल्यांमध्ये जखमी झाले आहेत. विचित्र प्रकार म्हणजे यातील निम्म्याहून अधिक हल्ले निव्वळ अफवा आणि भावना भडकविण्यातून झालेले आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 2:02 am

Web Title: not in my name protest in india
Next Stories
1 एअर इंडियातील निर्गुंतवणुकीला केंद्र सरकारची तत्वत: मंजुरी
2 आता एटीएमप्रमाणे ट्रेनमध्ये फूड मशीन; प्रवाशांना मिळणार गरमागरम जेवण
3 योगी आदित्यनाथांच्या हिंदू वाहिनीच्या ३ कार्यकर्त्यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक