सत्तेवर आल्यापासून म्हणजेच मागील चार वर्षात शिक्षणाचं भगवीकरण एकदाही केलं नाही असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. आम्ही गेल्या चार वर्षात इतिहासाचे एक पानही बदलले नाही. आपले तत्वज्ञान सांगायचे असेल तर त्यासाठी पुस्तकांचा आधार घ्यावा लागत नाही, आम्ही जनतेशी थेट संवाद साधतो आणि आपले म्हणणे मांडतो असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. एज्युकेशन अॅन्ड स्कील समिट २०१८ मध्ये प्रकाश जावडेकरांनी सहभाग घेतला त्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की भाजपाच्या कार्यकाळात इतिहास बदलण्याचा प्रयत्न होतो आहे, ज्यावर त्यांनी आम्ही इतिहासाचे एक पानही बदलले नाही असे उत्तर दिले आहे.

शिक्षण हा निवडणुकांचा मुद्दा असू शकत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षण हा मुद्दा मुख्य प्रवाहात आणला. शिक्षण व्यवस्थेत इतक्या कमतरता आहेत की अनेकदा नववीतला मुलगा सातवीचे पुस्तकही वाचू शकत नाही. शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा सुधारणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही त्यासाठी विशेष प्रयत्न करतो आहोत. आम्ही शिक्षकांचे एक वर्कशॉप घेणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. एनी टाइम लर्निंग, एनी प्लेस लर्निंग आणि लाइफ लॉन्ग लर्निंग यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो आहोत असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. शिक्षणाचा उद्देश फक्त नोकरी मिळवणे हा नसावा तर शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगिण विकास झाला पाहिजे.

उच्च शिक्षणावरही त्यांनी त्यांचे मत मांडले, देशातील विद्यापीठांमध्ये मागील दहा वर्षांपासून जे अभ्यासक्रम राबवले जात आहेत त्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत. नवा अभ्यासक्रम लवकरच आणला जाईल असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले.