पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तिथंल राजकीय वातावरण आता चांगलंच गरम होऊ लागलं आहे. भाजपा व तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांची या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचार सभांचा धडका सुरू झाला आहे. आज (सोमवार) पंतप्रधान मोदींनी हुगळी येथील एका सभेत बोलताना तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला.
मोदी म्हणाले, “तुमचा उत्साह आणि उर्जा कोलकाताहून दिल्ली पर्यंत एक मोठा संदेश देत आहे. आता पश्चिम बंगालने परिवर्तनासाठी मन बनवलं आहे” तसेच, कमळ पश्चिम बंगालमध्ये अस्सल परिवर्तन आणणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
Strong support all over West Bengal for @BJP4India. Watch from Hooghly. https://t.co/8CfYgb8ceo
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2021
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल सरकारवर निशाणा साधताना मोदींनी सांगितलं की, पश्चिम बंगालमधील लाखो गरजुंना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणारे पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळू शकलेले नाही. बंगालमधील जनता आणि विकास यांच्यात ममता बॅनर्जींच्या सरकारने तयार केलेल्या अडथळ्यांचा हा प्रकार आहे. राज्यातील आतापर्यंतच्या सरकारांनी या ऐतिहासिक क्षेत्राला आहे त्या परिस्थितीत सोडून दिलं होतं. येथील पायाभूत सुविधा व वारशांची दुरावस्था होऊ दिली गेली.
मोदी म्हणाले, आम्ही असा बंगाल बनवू जो रोजगार व स्वरोजगाराने युक्त असेल. जिथं सर्वांचा विकास होईल. माँ, माटी आणि मानुषच्या गप्पा करणारे लोकं बंगालच्या विकासासमोर भिंत बनून उभे राहिले आहेत. बंगालमध्ये कमळ फुलणं यासाठी गरजेचं आहे कारण की बंगालमध्ये ते परिवर्तन यायला हवं, ज्याच्या आशेवर आपले तरूण जगत आहेत.
तसेच, या वर्षी रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिविटी केंद्र सरकारची प्राथमिकत आहे. ही कामं दशकांपूर्वीच व्हायला हवी होती. आता आपल्याला आणखी उशीर करायला नाही पाहिजे. रेल्वे लाइन्सच्या विस्ताराबरोबरच विद्युतीकरणांच्या कामांसह अनेक पायाभूत सुविधांच्या योजनांसाठी गुंतवणूक केली जात आहे. अशी देखील मोदींनी यावेळी माहिती दिली.