भारतात एखाद्या तरुणीचं एनआरआय पुरुषासोबत लग्न झाल्यास ४८ तासात नोंदणी झाली पाहिजे असा आदेश मनेका गांधी यांच्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. सध्या भारतात लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाहीये. कायदा आयोगाच्या अहवालात लग्नाची नोंदणी करण्यासाठी ३० दिवसांचं बंधन असलं पाहिजे, त्यानंतर प्रत्येक दिवसामागे पाच रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.

‘एनआरआय लग्नाची नोंदणी ४८ तासात झाली पाहिजे, अन्यथा पासपोर्ट किंवा व्हिसा मिळणार नाही’, असं मनेका गांधींनी सांगितलं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, महिला आणि बालविकास मंत्रालयाने रजिस्ट्रारना अशा लग्नांची माहिती पुरवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरुन सेंट्रल डेटाबेसदेखील अपडेट राहिल.

यासाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आलं आहे. या पोर्टलवर एनआरआय नवरदेवांशी करण्यात आलेल्या लग्नाची नोंदणी करावी लागेल. आतापर्यंत अशा पाच प्रकरणात एनआआय नवरदेवांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे अशी माहिती मनेका गांधी यांनी दिली आहे. ‘भारतातील तरुणींशी लग्न करुन एनआरआय नवरदेव परदेशात पळून जाण्याच्या समस्येवर अंकुश ठेवण्यासाठी महिला आणि बालविकास मंत्रालयाशिवाय परराष्ट्र आणि गृह मंत्रालय एकत्र काम करत आहे’, अशी माहिती मनेका गांधी यांनी दिली आहे.

मनेका गांधी यांनी सांगितल्यानुसार, ‘परराष्ट्र, गृह आणि महिला व बालविकास मंत्रालयाच्या प्रतिनिधींची एक समिती गठीत करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर कारवाई होईल याची जबाबदारी या समितीकडे असेल’.

‘राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आणि समितीने घेतलेल्या निर्णयानुसार एनआरआय पतीच्या परदेशी प्रवासावर नजर ठेवण्यासाठी गृहमंत्रालयाकडून लूक आऊट नोटीस जारी करण्यात येते जेणेकरुन संबंधित व्यक्तीला परदेशात जाण्यापासून रोखता येतं’, असंही त्यांनी सांगितलं.