पश्चिम बंगालमध्ये ज्या जिझस अँड मेरी स्कूलमध्ये सत्तरीतील जोगिणीवर सामूहिक बलात्कार झाला होता त्या शाळेला राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने भेट दिली असून राज्य सरकारने या प्रकरणी आठवडाभरातही कुणाला अटक केली नसल्याबद्दल ताशेरे ओढले आहेत.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सदस्य व सामूहिक बलात्कार प्रकरणातील चौकशी समितीच्या प्रमुख शमिना शफिक व इतर तीन सदस्यांनी शाळेच्या अधिकाऱ्यांशी एक तास चर्चा केली.
शफीक यांनी सांगितले की, या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आली नाही ही चिंतेची बाब आहे व या घटनेतील गुन्हेगारांचे चित्रीकरण उपलब्ध आहे तरी कारवाई करण्यात अपयश आले आहे. ही राज्य प्रशासनाची चूक आहे काय असे विचारले असता ते म्हणाले की, ही राज्य प्रशासनाची चूक आहे यात शंका नाही. हा अतिशय दुर्दैवी प्रकार होता असे परत घडता कामा नये, १४ मार्चला झालेल्या या घटनेचे सीसीटीव्हीमध्ये जे चित्रण झाले आहे त्यात आरोपी दिसत आहेत. ही जोगीण त्या शाळेत सिस्टर सुपीरियर म्हणून काम करीत होती. पहाटे चार जणांच्या टोळक्याने या शाळेत घुसून १२ लाखांची लूट केली तसेच या जोगिणीवर सामूहिक बलात्कार केला. नंतर या जोगिणीवर उपचार करण्यात आले. नंतर विमानतळावरून ती अज्ञात ठिकाणी निघून गेली. राज्य सरकारने अगोदर सीआयडी चौकशीची घोषणा केली होती पण नंतर सीबीआयकडे तपास देण्यात आला. नवीन तपासानुसार संशयित आरोपी बांगलादेशात पळाल्याचा संशय आहे. अजून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने या प्रकरणाची चौकशी हाती घेतलेली नाही.