मुंबईमध्ये २६/११ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीला अद्याप पाकिस्तानमध्ये सुरूवात का झाली नाही, असा प्रश्न अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना विचारला. हा प्रश्न उपस्थित करून यासंदर्भात भारताने उपस्थित केलेल्या मुद्द्याला ओबामा यांनी समर्थनच दिले आहे.
अमेरिकेच्या दौऱयावर असलेल्या शरीफ यांनी बुधवारी ओबामा यांची व्हाईट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे दोन तास विविध प्रश्नांवर चर्चा झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शऱीफ यांनीच त्यांच्यातील चर्चेबद्दल माहिती दिली. मुंबईमधील दहशतवादी हल्ल्यातील आरोपींवर अद्याप न्यायालयात सुनावणी का सुरू झाली नाही, असा प्रश्न ओबामा यांनी आपल्याला विचारल्याचे शरीफ यांनी सांगितले. सीमेवरील दहशतवादी कारवाया, जमात उद दवा ही दहशतवादी संघटना आणि ओसामा बिन लादेनला पकडून देण्यासाठी मदत करणारे डॉ. शकील आफ्रिदी यांना तुरुंगात डांबण्यात आल्याचा विषयही ओबामा यांनी या भेटीमध्ये उपस्थित केल्याचे शरीफ म्हणाले. या भेटीमध्ये काश्मीर मुद्द्यासह भारतासोबतच्या पाकिस्तानच्या संबंधांवर सखोल चर्चा झाल्याचे ते म्हणाले.