पटेल (पाटीदार) समाजाला इतर मागासवर्गीयांचा (ओबीसी) दर्जा देण्याबाबत त्या समाजाच्या मागणीला विरोध दर्शवण्यासाठी हजारो ओबीसी सदस्यांनी रविवारी येथे मोठी मिरवणूक काढली. गुजरात सरकार पटेल समाजाच्या मागणीसमोर झुकल्यास त्यांना ‘उखडून फेकू’, अशी धमकी या लोकांनी दिली.पटेल समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास २०१७च्या विधानसभा निवडणुकीत सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील, या पटेल समाजाच्या नेत्यांनी दिलेल्या इशाऱ्यावर ‘गुजरात क्षत्रिय- ठाकोर सेना’ संघटनेचे अध्यक्ष अल्पेश ठाकोर यांनी त्यांच्या भाषणात टीका केली. पटेल समाज आरक्षण मिळवण्यासाठी ज्या प्रकारे सरकारला निवडणुकीत उखडून देण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव आणत आहे, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने आमचा संयम गृहीत धरू नये. गुजरातमध्ये पटेल समाज फक्त १२ टक्के आहे, तर ओबीसी, अनुसूचित जाती व जमातीचे लोक लोकसंख्येच्या ७८ टक्केआहेत. त्यामुळे पटेल समाजाला एक टक्काही आरक्षण दिले, तर हे सरकार या वर्षांतच सत्तेवर राहणार नाही, २०१७ ची तर गोष्टच जाऊ द्या, असा इशारा ठाकोर यांनी दिला. आरक्षणासाठी सुरू असलेल्या पटेल समाजाच्या आंदोलनाला विरोध करण्यासाठी ओबीसीतील सर्व १४६ जाती एका छताखाली आणण्याची चळवळ ठाकोर राबवत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2015 12:06 pm