अमेरिकेतील ओहायोमधील विद्यापीठामध्ये बंदुकधारी तरुणाने अंधाधूंद गोळीबार केला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या गोळीबारात सात जण जखमी झाले असून हल्लेखोराचा पोलिसांच्या कारवाईत मृत्यू झाला आहे. जखमींपैकी २ जणांची प्रकृती स्थिर असून उर्वरित पाच जणांविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

ओहायो राज्यातील कोलंबस येथे ओहायो विद्यापीठ असून या विद्यापीठात सुमारे ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सोमवारी स्थानिक वेळेनुसार १० वाजता बंदुकधारी हल्लेखोराने विद्यापीठात गोळीबार केला. अभियांत्रिकी शाखेच्या इमारतीजवळ गोळीबाराचा आवाज आल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. हल्लेखोराकडे रिव्हॉल्वर असावी असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. विद्यापीठाने ट्विटकरुन विद्यार्थ्यांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. तसेच पोलिसांच्या सुचनांचे पालन करा आणि सुरक्षित ठिकाणी जा असे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सांगितले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ माजली होती. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी वर्गांमधील बाकडे आणि खुर्च्यांनी दरवाजा अडवून ठेवला होता.

गोळीबाराच्या वृत्तानंतर पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यापीठाचा परिसर खाली केला. दोन तास परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. स्थानिक प्रसारमाध्यमांनी संशयित हल्लेखोर ठार झाल्याचे म्हटले आहे. मात्र पोलिसांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिला नाही. ‘मी पहिल्यांदा गोळीबाराचा आवाज ऐकला आणि त्यानंतर भीतीपोटी ओरडणा-या विद्यार्थ्यांचा आवाज माझ्या कानी पडला. यानंतर पाच सेकंदांनी पुन्हा तीन वेळा गोळ्या झाडल्याचा आवाज आला. मी यापूर्वी कधी अशी घटना बघितले नव्हती. प्रत्येक विद्यार्थी दिसेल त्या मार्गाने सैरावैरा पळत होता’ अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याने स्थानिक प्रसारमाध्यमांना दिली.