केंद्र सरकारने गुरूवारी पेट्रोल-डिझेलचे उत्पादन शूल्क कमी करण्याची घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयाची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्तुती केली आहे. कर कपातीच्या या निर्णयामुळे मोदी सरकारची देशातील जनतेप्रतिची संवेदनशीलता दर्शवते, असे शाह यांनी म्हटले आहे.

अमित शाह यांनी याबाबत ट्विट केले आहे. मोदी सरकारद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर २.५ रुपयांनी कमी करण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हा निर्णय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा देशाच्या जनतेप्रतिची संवेदनशीलता दर्शवते.

तत्पूर्वी, भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात २.५० रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आणि राज्यांना व्हॅटच्या रुपयात २.५० कमी करण्याची विनंती केली आहे. हा सरकारचा संवेदनशील निर्णय आहे.

सरकारने महसुली तोटा ३.३ टक्के ठेवण्याबाबत भाष्य केले आहे. त्यामुळे हा केवळ संवेदनशील निर्णय नव्हे तर आर्थिक दृष्टीकोनातून अत्यंत बुद्धिमानपणे घेतलेला निर्णय आहे. यामुळे आर्थिक आकडेवारीवर काहीच परिणाम पडणार नाही, हे लक्षात घेतले आहे, असे पात्रा म्हणाले.

यूपीए सरकारच्या वेळी पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी तेल रोख्यांचा वापर केला जात असे. म्हणजे एक प्रकारे आपली संपत्ती गहाण ठेवली जात असत. अशा पद्धतीने सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे तेल रोखे जारी करण्यात आले. हे पैसे चुकते करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यांनी ज्यापद्धतीने सामान्य जनतेप्रति संवेदनशीलता दाखवत पेट्रोलचे दर कमी केले आहेत. त्यासाठी भाजपा केंद्र सरकारचे आभार मानते, असेही पात्रा यांनी म्हटले.