ओला आणि उबर या खासगी वाहतूक सुविधा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा असली तरीही या कंपन्यांचे येत्या काही दिवसांत विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने दोन्ही कंपन्यांचे मागील काही दिवसांपासून बोलणे सुरु असून तो निर्णय काही दिवसांत होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उबरच्या दक्षिणपूर्व आशियातील व्यवसाय विक्रीमागे सॉफ्ट बँकची महत्वाची भूमिका आहे. भारतीय बाजारपेठेतून जास्तीत जास्त नफा कमावण्याची रणनिती त्यामागे आहे.
बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार एका जॅपनिज कंपनीचे ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांमध्ये शेअर असून उबरमध्ये १५ टक्के तर ओलामध्ये २५ टक्के शेअर आहेत. ही माहिती अद्याप सार्वजनिकरित्या बाहेर आलेली नसली तरीही आशिया खंडामध्ये अशाप्रकारचा व्यवहार होऊ शकतो असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र ओला आणि सॉफ्टबँक यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. तर उबरनी विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरु नसल्याचे सांगितले. नुकतीच ओलाने आपल्या सेवेत मोठ्या प्रमाणात कपात केली असूनही देशातील १०० शहरांमध्ये उबरच्या बरोबरीने ओलाचे अस्तित्व आहे. त्यामुळे या दोन कंपन्या एकत्र झाल्यास नेमके काय होणार याबाबत मात्र अद्याप प्रश्नचिन्ह आहे.
नुकताच मुंबईमध्ये ओला आणि उबरच्या चालकांनी संप पुकारला होता. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ज्या चालकांना काळया यादीत टाकण्यात आल्याने हा संप पुकारण्यात आला होता. मनसेच्या नेतृत्वाखाली हा संप पुकारला गेला होता. मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत अॅपबेस टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला आणि उबर या दोन्ही कंपन्या अल्पावधीत महत्वपूर्ण ठरल्या आहेत. एकटया मुंबईमध्ये ४५ हजारपेक्षा जास्त अॅप बेस टॅक्सी चालतात असा अंदाज आहे.