केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच तीव्र होत आहे. आज आंदोलनाचा १७ दिवस होता मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने, शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एवढच नाहीतर आता आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करण्याचा इशाराही एकप्रकारे देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व शेतकरी संघटनांचे नेते १४ डिसेंबर रोजी एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार असल्याचे आज संयुक्त किसान आंदोलनचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू यांनी सांगितले आहे.

आंदोलनाच्या १७ व्या दिवशी देखील काहीच तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांकडून आता उपोषणाचा इशारा दिला गेला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना संयुक्त किसान आंदोलनचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू म्हणाले, १४ डिसेंबर रोजी सर्व शेतकरी नेते सिंघू सीमेवर एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार आहेत. सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही या कायद्यांमधील दुरूस्तीच्या बाजूने नाही. केंद्राला आमचे आंदोलन उधळायचे आहे, परंतु आम्ही ते शांततेच्या मार्गाने सुरूच ठेवणार आहोत.

तसेच,आम्ही आमच्या माता-भगिनींना देखील या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहोत. त्यांच्या राहण्यासह अन्य प्राथमिक सुविधांची सोय झाल्यानंतर आम्ही त्यांना या आंदोलनात सहभागी करणार आहोत. उद्या ११ वाजता राजस्थानमधील शाहजहांपूरपासून जयपूर-दिल्ली मार्ग रोखण्यासाठी हजारोंच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर मार्च काढणार असल्याचेही पन्नू यांनी सांगितले.

पंजाबहून येणाऱ्या शेतकऱ्यांना रोखलं जात आहे – गुरनाम सिंह
शेतकरी नेते गुरनाम सिंह यांनी सांगितले की, पंजाबहून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॉली अडवल्या जात आहेत. आम्ही सरकारकडे शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत पोहचू देण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहोत. जर सरकारने १९ डिसेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर, आम्ही त्याच दिवशी गुरुतेग बहादुर यांच्या शहीद दिनी उपोषण सुरू करू.

अंबनी व अदानीच्या मालमत्तांवर आम्ही धरणे आंदोलन करू – प्रेमसिंह गहलावत 
दिल्लीच्या बुराडी निरंकारी मैदानावर कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रेमसिंह गहलावत यांनी म्हटले आहे की, पलवल आणि जयपूर मार्ग जयपूरहून आलेल्या संघटना आज बंद करतील. तसेच, अंबानी व अदानी यांच्या मालमत्तांवर आम्ही धरणे आंदोलन करू, जिओ सिम व जिओ फोनवर बहिष्कार टाकला आहे. हरियाणचे टोल फ्री केले जातील.