भारतात सरकारच्या आदेशानंतर टिकटॉक हे चिनी उपयोजन (अॅप) बंद होताच त्याची जागा ‘चिंगारी’ या उपयोजनाने घेतली आहे. त्याचे प्लेस्टोअरवरून १ कोटीहून अधिक डाऊनलोड झाले आहेत.
भारत सरकारने अलीकडेच टिकटॉकसह ५९ चिनी उपयोजनांवर बंदी घातली होती. टिकटॉक हे लघुचित्रफीत उपयोजन चीनच्या बाइटडान्सच्या मालकीचे आहे. सरकारने टिकटॉक बंद केल्यानंतर भारतातील त्याचे प्रतिस्पर्धी उपयोजन असलेल्या ‘चिंगारी’ व ‘मित्रों’ उपयोजनांची सरशी झाली आहे. चिंगारी अॅपचे तासाला १ लाख डाउनलोड झाले आहेत.
टिकटॉक बंद झाल्याने त्याचे भारतातील स्पर्धक खूश आहेत. चिंगारीच्या मुख्य उत्पादन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चिंगारीचे तासाला १ लाख डाऊनलोड होत आहेत. आता आम्ही सव्र्हरची क्षमता वाढवत आहोत व ही मागणी पूर्ण करणार आहोत. गुगल प्ले स्टोअरवरून ७२ तासांत चिंगारीचे ५ लाख डाऊनलोड झाले. आता टिकटॉक पूर्ण बंद झाले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिनी समाजमाध्यम ‘वेईबो’वरून आपले खाते रद्द केले आहे. खाते रद्द करून पंतप्रधानांनी चीनला व्यक्तिगत पातळीवरही कठोर संदेश दिला आहे.