22 November 2017

News Flash

निम्मे इंग्रज झोपतात अस्वच्छ अंथरुणात!

सार्वजनिक स्वच्छतेबाबत अत्यंत काटेकोर असणाऱ्या आणि त्यावरून तिसऱ्या जगतातील देशांना नाके मुरडणाऱ्या ब्रिटनमधील नागरिकांच्या

पीटीआय, लंडन | Updated: January 9, 2013 1:10 AM

सार्वजनिक स्वच्छतेबाबत अत्यंत काटेकोर असणाऱ्या आणि त्यावरून तिसऱ्या जगतातील देशांना नाके मुरडणाऱ्या ब्रिटनमधील नागरिकांच्या वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी मात्र काळजी करण्यायोग्य आहेत. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमधील अनेक नागरिक महिना-महिना साधे अंथरुणही बदलत नाहीत. यामुळे ब्रिटनमध्ये दम्यासारखे आजार बळावत असल्याची शक्यता आहे.  
ब्रिटनमधील दोन हजाराहून अधिक लोकांच्या शयनगृहातील सवयींबाबत डय़ुनेम मिल या होमरिटेलर कंपनीसाठी करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे निष्कर्ष ‘डेली मेल’ या वृत्तपत्राने नुकतेच प्रसिद्ध केले. त्यानुसार सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांपैकी निम्म्याहून अधिक जण घाणेरडय़ा अंथरुणातच झोपत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे शयनगृहातील साफसफाईबाबत ब्रिटिश महिला अधिक निष्काळजी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे, तर ब्रिटनमधील एक पंचमांश नागरिक महिन्यातून एकदाही आपले अंथरुण बदलत नाहीत. पाचातल्या दोन व्यक्ती आठवडय़ातून एकदा आपले अंथरुण बदलतात.
लंडनमधील एका नामांकित रुग्णालयातील लहान मुलांमधील अ‍ॅलर्जी या विषयातील तज्ज्ञ डॉ. अ‍ॅडम फॉक्स यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आपण आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ झोपण्यात व्यतीत करतो. आपला देह रोज लक्षावधी त्वचापेशींचा त्याग करीत असतो. त्यातील बऱ्याचशा पेशी रात्री झोपेत असताना गळून पडतात आणि आपल्या अंथरुणावर साठत जातात. याशिवाय आपल्या देहातून घाम, तेल, लाळ यांसारखे स्राव स्रवत असतात, असे सांगून डॉ. फॉक्स यांनी, रोजच्या रोज स्वच्छ अंथरुणात झोपण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
अस्वच्छतेचा कहर..
ब्रिटनमधील एक पंचमांश नागरिक महिन्यातून एकदाही आपले अंथरुण बदलत नाहीत. पाचातल्या दोन व्यक्ती आठवडय़ातून एकदा आपले अंथरुण बदलतात.

First Published on January 9, 2013 1:10 am

Web Title: one fifth of britons dont change bed sheets even once a month