पेट्रोलियम मंत्रालयातील हेरगिरी प्रकरणात आणखी एका टोळीचा छडा लागला असून दिल्ली पोलिसांनी एकाला अटक केली असून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात काही बडय़ा कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयात हेरगिरी करून महत्त्वाची कागदपत्रे मिळवली आहेत.
     गुन्हे अन्वेषण शाखेने या टोळीवर एफआयआर म्हणजे प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला असून दुसऱ्याच्या हद्दीत घुसणे, दरोडा, गुन्हेगारी कट व घोटाळा असे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आधी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. महानगर दंडाधिकारी धीरज मित्तल यांनी लालता प्रसाद, राकेश कुमार, प्रयास जैन, शांतनु सैकिया यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आज अटक करण्यात आलेल्या टोळक्याचा प्रमुख लोकेश हा असून तो नॉइडा येथे सल्लागार संस्थेत काम करतो. गुन्हे अन्वेषण शाखेने जबाबासाठी आणखी सहा जणांना शास्त्री भवन येथून ताब्यात घेतले असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. दिल्ली व राजधानी परिक्षेत्रात याबाबत छापे व तपास सुरू आहे.
दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी सांगितले, की चौकशीनुसार लोकेश हा कोळसा व ऊर्जा मंत्रालयातील कागदपत्रे पळवण्यात सामील होता. त्यामुळे आम्ही त्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याच्या साथीदारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी दुसरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या टोळक्याने नेमकी काय पद्धत वापरली व त्या कागदपत्रांचा फायदा कुणाला झाला, असे विचारले असता बस्सी यांनी सांगितले, की लोकेशच्या साथीदारांना अटक केल्यानंतर सर्व माहिती सांगता येईल.
वेगळा एफआयआर का दाखल करण्यात आला, असे विचारण्यात ही दुसरी टोळी होती व त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध नाही पण प्रकरण तसेच आहे. त्याचा थेट संबंध नसल्याने आम्ही त्याला अटक करून वेगळा एफआयआर दाखल केला. लोकेशचे दुपारी जाबजबाब घेण्यात आले.
तेल मंत्रालयाच्या दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना व तीन मध्यस्थांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी वर्गीकृत कागदपत्रे ऊर्जा कंपन्यांना विकली आहेत.
शुक्रवारी शंतनु सैकिया व प्रयास जैन तसेच ऊर्जा कंपनी सल्लागारांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली, रिलायन्सचे शैलेश सक्सेना, इस्सारचे विनयकुमार, के र्न्‍सचे के.के.नाईक, ज्युबिलंट एनर्जीचे सुभाष चंद्र व अडाग रिलायन्सच  (अनिल अंबानी समूह) ऋषी आनंद यांचा समावेश आहे.
दरम्यान, कंपन्यांनी पेट्रोलियम मंत्रालयात केलेल्या हेरिगिरी प्रकरणी चार जणांना दिल्ली न्यायालयाने ६ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. कोठडीतील जाबजबाबात आपल्या कोऱ्या कागदांवर सह्य़ा घेण्यात आल्या अशी आरोपींनी तक्रार केली आहे.