दारुचे दुकान चालविणाऱ्या भारतीय व्यावसायिकाची अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना रविवारी अमेरिकेतील ओहिओ प्रांतात उघडकीस आली आहे. २७ डिसेंबर रोजी न्यूयॉर्क येथे एका भारतीय नागरिकाला वर्णद्वेषातून चालत्या रेल्वेसमोर ढकलून त्याला जीवे मारण्यात आले होते.
अवघ्या चार दिवसांत दोन भारतीयांच्या हत्येच्या घटना समोर आल्यामुळे अमेरिकेतील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वेंकट रेड्डी गोली ४७ असे या भारतीय नागरिकाचे नाव असून तो आंध्रप्रदेशचा रहिवाशी होता. ओहिओ प्रांतातील कोलेरेन भागात गोली यांचे सेंट्रल लिकर स्टोर हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री रेड्डी दुकानातून घरी न परतले नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने दुकानात जाऊन पाहणी केली असता रेड्डी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेनंतर रेड्डी यांच्या पत्नीने पोलिसांना फोन करून माहिती दिली. रेड्डी यांचे कुटुंबीय भारतात परतले असून हल्लेखोरांनी रेड्डी यांच्या तोंडात रिव्हॉल्व्हरने गोळी झाडल्याचे त्यांनी सांगितले.
कोलेरीन टाऊनशिप पोलीस खात्याचे प्रवक्त्यांनी सांगितले की, रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आले नाही. या हत्येप्रकरणी तपास सुरू असून आताच कोणतीही प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.