संदीप सिंह/अनिल सासी, एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

देशाच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये ६० टक्क्यांहून अधिक वाटा असलेल्या तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाच्या (ओएनजीसी) बँक खात्यामध्ये असलेली शिल्लक आणि रोख रक्कम पाहता भांडवली खर्च वारेमाप करण्यात आल्याचे सिद्ध होत आहे.

ओएनजीसीच्या बँक खात्यातील शिल्लक आणि रोख रक्कम मार्च २०१९ मध्ये ५०४ कोटी रुपये इतक्या नीचांकापर्यंत गेली आहे. मार्च २०१८ आणि मार्च २०१७ मध्ये ही शिल्लक आणि रोख रक्कम अनुक्रमे १०१३ कोटी रुपये आणि ९५११ कोटी रुपये इतकी होती, तर मार्च २०१६ मध्ये ९९५७ कोटी रुपये इतकी होती. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि गुजरातस्थित जीएसपीसीमधील समभाग खरेदी यामध्ये ओएनजीचा सहभाग होता आणि त्यामुळे ओएनजीसीच्या गंगाजळीत कपात झाली आहे.

तथापि, ओएनजीसीच्या कामचलाऊ भांडवली गरजा भागविण्यासाठी कंपनीकडे बँकेची पुरेशी पतपत्रे आणि भांडवली बाजारपेठेत शिरण्याचा मार्ग उपलब्ध आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. मात्र गेल्या सहा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे निदर्शनास येते की, ओएनजीसीचा तेलविहीर संशोधनाचा खर्च मार्च २०१४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ११ हजार ६८७ कोटी रुपये होता तो मार्च २०१९ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत निम्म्यावर म्हणजे सहा हजार ०१६ कोटींवर आला.