कांद्याचे भाव खाली यायला आणखी दोन ते तीन आठवडे लागतील, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये स्पष्ट केले. कांद्याचा तुटवडा तात्पुरता असल्याचेही त्यांनी सांगितले. 
गेल्या काही दिवसांपासून कांद्यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे सामन्यांच्या डोळ्यात ‘पाणी’ येण्याची वेळ आलीये. किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार म्हणाले, कांद्याचा तुटवडा तात्पुरता आहे. जोरदार पावसामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील कांद्याच्या पीकावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ झालीये. त्यामुळे उत्पादनात कोणतीही घट होणार नाही. महाराष्ट्र, कर्नाटक आणि राजस्थानमधून नवा कांद्याचे पीक बाजारात आल्यावर २-३ आठवड्यात भाव खाली येतील, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय वाणिज्य मंत्री आनंद शर्मा यांनीदेखील कांद्याचा कोणताही तुटवडा देशामध्ये नसून येत्या काही आठवड्यांमध्ये भाव उतरतील, असा विश्वास व्यक्त केला.