आयआरसीटीसीने ऑनलाइन तिकीट आरक्षित करणाऱ्यांसाठी खूशखबर दिली आहे. आयआरटीसीने आरक्षित तिकिटांच्या नियमात एक चांगला बदल केला असून आता ऑनलाइन तिकिटावरील प्रवाशांचे बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. पूर्वी ही सुविधा केवळ रेल्वे आरक्षण केंद्रावरून काढलेल्या तिकिटांपुरतीच मर्यादित होती.

देशात दररोज सुमारे तीन ते साडेतीन कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यातील ७० टक्के प्रवासी हे ऑनलाइन तिकिटावर प्रवास करत असतात. त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात प्रवाशांना लाभ होणार आहे.

अनेकदा प्रवाशांना बोर्डिंग स्थळ बदलावे लागते. २४ तास आधी आरक्षण केंद्रावर जाऊन त्यांचे बोर्डिंग बदलता येत होते. ऑनलाइन तिकिटांच्या बाबतीत मात्र ही सुविधा नव्हती. रेल्वे नियमाप्रमाणे तिकीट पर्यवेक्षक प्रवाशांचे तिकीट ज्या स्थानकावरून आहे, त्या स्थानकापासून दुसऱ्या स्थानकापर्यंत प्रवाशांची वाट पाहतो. दुसरे स्थानक आल्यानंतर तो प्रवासी प्रवास करण्यास उपस्थित नसल्याचे समजून त्याचे सीट आरएसी अथवा वेटिंग असणाऱ्या दुसऱ्या प्रवाशास देतो. त्यामुळे ऑनलाइन तिकीटधारकांसाठी बोर्डिंग बदलणे हे चिंतेचे ठरत होते. आयआरसीटीसीने या नव्या नियमाच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.

प्रवाशांनी एकदा आपले बोर्डिंग बदलल्यानंतर त्यांना पुन्हा त्यात बदल करता येणार नाही. तसेच त्यांना बोर्डिंग स्टेशनवरून प्रवास करणे बंधनकारक असणार आहे. अगोदरच्या स्टेशनवरून प्रवास करताना आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही.