सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. करोनाचा सामना करण्यासाठी अनेक देश शर्थीचे प्रयत्नही करत आहे. चीनमधून सुरू झालेला करोना आता जगभरात पोहोचला आहे. तर दुसरीकडे चीनमधील परिस्थितीत पूर्वीच्या तुलनेत सुधारली आहे. अशा परिस्थितीत दक्षिण चीन महासागरात मात्र चीननं युद्ध सराव केल्याची माहिती समोर आली आहे.

अ‍ॅन्टी शिप, अ‍ॅन्टी सबमरीन आणि अ‍ॅन्टी एअरक्राफ्ट बंदुकांच्या मदतीनं चीननं या क्षेत्रात मोठा युद्ध सराव केला. या क्षेत्रात असेलेला आपला प्रभाव दाखवून देणं हा या युद्धसरावामागील चीनचा हेतू होता. याव्यतिरिक्त चीननं फ्लीटच्या नेव्हिगेशनचाही सराव केला. चीनच्या या युद्ध सरावानंतर अमेरिकेनं कठोर शब्दात याचा निषेध केला आहे.

सध्या दक्षिण चीन महासागरात अमेरिकेचं कोणतीही युद्धनौका उपस्थित नाही. अमेरिकेच्या युद्धनौका करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या प्रशासनासोबत कार्यरत आहेत. या वेळेचा फायदा घेऊन चीननं हा युद्ध सराव केल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर अनेक स्तरातून चीनच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. तर दुसरीकडे चीननं अमेरिकेवरच निशाणा साधला. आम्ही अन्य देशांना करोनाविरूद्ध लढण्यास मदत करत आहोत. अशावेळी अमेरिका आपल्या युद्धनौका दक्षिण चीन महासागरात पाठवत असल्याचं चीननं म्हटलं आहे.

अमेरिकेच्या युद्धनौकेत १७० करोना पॉझिटिव्ह
नुकताच अमेरिकेची युद्धनौका यूएसएस थियोडोर रूझवेल्टनं दक्षिण चीन महासागराचा दौरा केला होता. दरम्यान, या युद्धनौकेवर करोनाचे १७० पॉझिटिव्ह असल्याची माहिती युद्धनौकेचे कॅप्टन ब्रेट क्रोझिअर यांनी पत्राद्वारे दिली होती. तसंच त्यांनी अमेरिकेकडे मदतीची मागणीही केली होती.

या देशांमध्ये वाद
दक्षिण चीन महासागरात अनेक छोटी बेटं आहेत. त्यातील सर्वाधिक भागावर चीन दावा करत आला आहे. तर दुसरीकडे फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई या देशांनी चीनचा दावा नाकारला आहे. या क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव पाहता दक्षिण चीन महासागरातील एका बेटावर इंडोनेशियानंही आपली लढाऊ विमानं तैनात केली होती.