राफेल करार, पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅसची दरवाढ आणि वाढत्या महागाईच्या मुद्यावर विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण २०१९ च्या निवडणुकीत लोकांचा कल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेच असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. एबीपी आणि सी-व्होटरने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१९ मध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळतील. पण २०१४ च्या तुलनेत जागा कमी होतील असा अंदाज या सर्वेत वर्तवण्यात आला आहे.

सद्य स्थितीत निवडणुका झाल्यास एनडीएला ३८. २ टक्के मते, तर युपीएला २५.४ टक्के मते मिळतील. अपक्ष आणि इतर पक्षांना ३६.४ टक्के मते मिळतील असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. आज निवडणुका झाल्यास एनडीएला २७६ जागांवर विजय मिळेल. तर युपीएला ११२ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्वतंत्र लढणारे पक्ष आणि अपक्ष असे ११५ उमेदवार निवडून येतील असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २८२ जागांवर ‘कमळ’ फुलले होते. एकहाती सत्तेत असलेला भाजपा २०१९ मध्ये ५३४ पैकी २४८ जागांपर्यंत मजल मारेल, आणि मित्रपक्षाच्या २८ जागांसह २७४ खासदारासह सत्तेचा दावा करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. गेल्या निवडणुकीत ४४ जागांवर समाधान मानणारा काँग्रेस पक्ष यावेळी ८३ जागांपर्यंत मजल मारेल, आणि मित्रपक्षाचे ३२ खासदार त्यांना पाठिंबा देतील असा अंदाज आहे.

महाराष्टातील ४८ जागांवर सर्व पक्ष स्वतंत्र निवडणूक लढल्यास भाजपा २२ जागांवर आपले जिंकेल तर शिवसेना ७, काँग्रेस ११ आणि राष्ट्रवादीचे आठ जागांवर खासदार निवडून येतील. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजपा-शिवसेना एकत्र निवडणूक लढल्यास एनडीएला ३६ तर युपीएला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. कांग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आणि भाजपा ,शिवसेना स्वतंत्र लढल्यास युपीएला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना फक्त दोन जागांवर येईल आणि एनडीए १६ जागावर कमळ फुलवण्यात यश येईल असा अंदाज आहे.