ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्या (सीएए)वरून घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांना सरकारला प्रश्न विचारण्याचा व राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार असल्याचं राऊत म्हणाले आहेत.

या प्रकरणी ‘एएनआय’शी बोलताना राऊत म्हणाले, दिल्लीतील हिंसचारा हा संवेदनशील मुद्दा आहे. गृह मंत्रालय जबाबदार आहे. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा व राजीनाम्याची मागणी करण्याचा अधिकार आहे. पंतप्रधान असो किंवा गृहमंत्री त्यांनी सभागृहात येऊन उत्तर द्यायला हवं.

२००४ ते २००८ या कालावधीत केंद्रीय गृहमंत्री असलेल्या शिवराज पाटील यांना त्या काळात दिल्लीत घडलेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर राजीनामा द्यावा लागला होता. तथापी सरकार जबाबदारी घेत नाहीए. ते यासाठी विरोधकांवर आरोप करत आहेत. असंही राऊत म्हणाले.

दिल्ली हिंसाचारावरून संसदेत विरोधकांनी निषेध नोंदवल्यानंतर त्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. दिल्ली हिंसाचारात ४७ जणांचा मृत्यू झाला तर जवळपास २०० जण जखमी झाले आहेत.