एनआरसी, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून प्रसिद्ध लेखकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि शाह यांची अजून हत्या का करण्यात आली नाही, असं तामिळ लेखक नेल्लई कन्नन म्हटलं होतं. त्यावरून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कन्नन यांना अटक केली आहे.

तामिळ लेखक नेल्लई कन्नन यांनी २९ डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध करत असताना त्यांनी मोदींविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तामिळनाडूमधील पेरंबलूर येथून त्यांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्यांवरून वाद प्रतिवाद सुरू आहे. राजकीय पक्षांनी या कायद्याचा विरोध केला आहे. त्यातच तामिळनाडूतील सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) या कायद्याविरोधात आंदोलन केले. आंदोलनात बोलताना नेल्लई कन्नन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. “मला आश्चर्य वाटतंय अजूनपर्यंत मुस्लिम समाजातील लोकांनी मोदी आणि शाह यांची हत्या का केली नाही”, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर संतप्त पडसाद उमटले.


पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेल्लई यांना अटक व्हावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी मरीना बीच येथे धरणे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये पोन राधाकृष्णनन, सीपी राधाकृष्णनन, एल गणेशन आणि एच राजा यांचा समावेश होता. सूत्रांच्या माहितीनुसार, नेल्लई यांच्याविरोधात १५ पेक्षा अधिक खटले दाखल झाले आहेत. तसंच भारतीय दंडसंहितेतील तीन कलमांतर्गंत एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे. नेल्लई यांना अटक केल्यानंतर भाजपाचे सचिव एच. राजा यांनी ट्विट करुन याप्रकरणी त्यांचं मत नोंदविलं.

काय म्हणाले नेल्लई

शनिवारी एसडीपीआयद्वारे आयोजित एका कार्यक्रमामध्ये नेल्लई यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. “आश्चर्य वाटतंय अजूनपर्यंत मुस्लीम बांधवांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांची हत्या का केली नाही? मोदींच्या प्रत्येक निर्णयामागे अमित शाह यांचं डोकं आहे. त्यामुळे या दोघांना संपवून टाकलं पाहिजे. परंतु अजूनपर्यंत हे झालेलं नाही,” असं नेल्लई म्हणाले.