लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र आणि हरयाणाच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्याने खचलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी पक्षात संघटनात्मक निवडणुका घेण्याचे वारे वाहू लागले आहेत. पक्षाला नव्याने बळ मिळून टवटवी येण्यासाठी संघटनात्मक निवडणुका हेच योग्य माध्यम असल्याचे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांशी अनौपचारिक चर्चा केली. भविष्यात पक्षाला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी संघटनात्मक निवडणुका मुक्त, मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणात पार पडाव्या अशी गांधी यांची इच्छा आहे.
एम. रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखालील मध्यवर्ती निवडणूक प्राधिकरणाला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. बिहारमध्ये २०१० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपासूनच पक्षात संघटनात्मक दौर्बल्य आले असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचीच पुनरावृत्ती २०१२ मध्ये उत्तर प्रदेशात झालेल्या निवडणुकीतही झाली.
इतकेच नव्हे तर वाढती महागाई आणि भ्रष्टाचार याबरोबरच संघटनात्मक पातळीवर पक्ष दुबळा झाला हेही लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाचे एक कारण आहे. पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील वर्षी पक्षाच्या नव्या अध्यक्षांची निवड झाल्यावर ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.