अपहृत व्यक्तींची सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांना खंडणी देण्यामुळे इतर निरपराध अमेरिकन नागरिकांचा जीव धोक्यात घातला जातो, असे अमेरिकेने स्पष्ट केले. याच वेळी अफगाणिस्तानात अपहरण केलेल्या सैनिकांची सुटका करण्याच्या मोबदल्यात पाच तालिबानी दहशतवाद्यांना सोडून देण्याचा सरकारचा निर्णय योग्यच होता, असे स्पष्ट केले.
दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आलेल्या आणि पैशांसाठी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी सरकारने खंडणीच्या रूपाने पैसे देऊ केल्यास त्याचा इतर निरपराध नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असतो. गेल्या अनेक घटनांमधून सिद्ध झाले आहे, असे व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव जोश अर्नेस्ट यांनी बुधवारी सांगितले.
ओलिसांची सुरक्षित सुटका करण्यासाठी वा त्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी कोणतीही सवलत द्यायची नाही, तसेच खंडणी म्हणून दहशतवाद्यांना पैसै द्यायचे नाहीत, असे अमेरिकेचे धोरण आहे. व्हाइट हाऊस प्रशासनाने दोन कारणांवरून हे धोरण ठरवले आहे, असे अर्नेस्ट म्हणाले.
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने ओलीस ठेवलेल्या अमेरिकन नागरिकांची सुटका करण्यासाठी त्यांनी सरकारकडे खंडणी मागितली होती, याविषयी विचारले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
सीमांवरील कारवायांसाठी लागणारे आर्थिक पाठबळ दहशतवादी खंडणीच्या माध्यमातून कमावत असतात. काही प्रकरणांत तर खंडणी हाच त्यांच्या संघटनेचा आत्मा असतो. याच माध्यमातून ते पैसे गोळा करतात आणि सीमेवर पाठवत असतात, असे अर्नेस्ट म्हणाले.
गौन्टानामो तुरुंगातील मोजक्या दहशतवाद्यांना सोडून देण्याच्या बदल्यात सरजट बर्गदाल यांची सुटका करण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. अपहृतांची सुटका पैसे देऊन करण्याऐवजी राजकीय पातळीवर चर्चा करून त्यांच्या जीविताचे रक्षण करण्याची हमी व्हाइट हाऊस प्रशासनाने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दहशतवादी संघटनांनी पैशाची मागणी केली असली तरी ती यापुढे यशस्वी होऊ दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.