अमेरिकेसोबतचे संबंध ताणलेले असतानाच पाकिस्तानच्या पंतप्रधानांची अमेरिकेच्या जॉन एफ कॅनडी विमानतळावर कसून तपासणी करण्यात आल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी अमेरिकेच्या दौ-यावर गेले असताना त्यांच्यासोबत ही घटना घडली. आमच्या पंतप्रधानांचा हा अपमान असल्याचं सांगत पाकिस्तानच्या मीडियाने संताप व्यक्त केला आहे.

पाकिस्तानी टीव्ही चॅनल्सनुसार, अब्बासी यांची सामान्य नागरिकांप्रमाणे कपडे उतरवून तपासणी करण्यात आली. गेल्या आठवड्यात आजारी बहिणीला भेटण्यासाठी अब्बासी गेले असताना हा प्रकार झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. खासगी दौ-यातही अशाप्रकारे एखाद्या पंतप्रधानांची तपासणी करणं अपमान असल्याचं पाकिस्तानी मीडियाने म्हटलं आहे. या दौ-यात अब्बासी यांची अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांच्याशीही भेट झाली असं सांगितलं जात आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवली असून पाकिस्तानच्या अनेक कंपन्यांवरही प्रतिबंध आणले आहेत, त्यामुळे अमेरिका-पाकिस्तान संबंध ताणले आहेत. दरम्यान ट्रम्प सरकार पाकिस्तानवर व्हिसा बॅन करण्याच्या विचारात असल्याचंही सांगितलं जात आहे.