लडाखमध्ये तैनात असलेल्या भारतीय जवानांच्या स्थितीसंदर्भात कॅगने प्रसिद्ध केलेल्या अहवालावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:साठी ८,४०० कोटीचे विमान विकत घेतले. इतक्या पैशांमध्ये सियाचीन-लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांसाठी बरेच काही खरेदी करता आले असते, पंतप्रधान मोदींना सैनिकांची नव्हे, तर फक्त आपल्या इमेजची चिंता आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:साठी ८,४०० कोटी रुपयाचे विमान विकत घेतले. इतक्या पैशात सियाचीन-लडाख सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी ३० लाख उबदार कपडे, ६० लाख जॅकेट, ६७ लाख २० हजार बूट आणि १६ लाख ८० हजार ऑक्सिजन सिलिंडर विकत घेता आले असते. पंतप्रधानांना फक्त स्वत:च्या इमेजची चिंता आहे, सैनिकांची नाही” असे टि्वट राहुल गांधी यांनी केले आहे.

आर्थिक वर्ष २०१५-१६ आणि २०१७-१८ दरम्यान उंचावरील, थंड प्रदेशात सैनिकांच्या तैनातीसाठी आवश्यक कपडे आणि उपकरणांच्या खरेदीमध्ये चार वर्ष विलंब झाला आहे. बर्फात आवश्यक असणाऱ्या चष्मेही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत, कॅगच्या ऑडिट रिपोर्टमधून या बाबी समोर आल्या होत्या.

सियाचीन ही जगातील उंचावरील युद्धभूमी आहे. या भागात तैनात राहणाऱ्या जवानांसाठी खास कपडे, उपकरणांची आवश्यकता असते. आता पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर तणाव आहे. उंचावरील या युद्धक्षेत्रात तैनातीसाठी जवानांना खास कपडे आणि साहित्याची आवश्यकता आहे. चीन विरोधात दीर्घकाळ तैनातीच्या दृष्टीने भारतीय सैन्याने पूर्ण तयारी केली आहे.