‘पद्मावत’ चित्रपट अखेर रिलीज झाला पण त्यावर सुरू असलेला वाद काही शमण्याचे नाव घेताना दिसत नाही. अजूनही या चित्रपटाला देशातील काही भागात विरोध सुरूच आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी उडी मारली आहे. हिंमत असेल तर मोहम्मद पैगंबरांवर चित्रपट बनवून त्यात त्यांचे चरित्र दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले आहे. एएनआयशी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा राजस्थानमध्ये पद्मावत चित्रपटाचे चित्रीकरण होत होते. तेव्हा भन्सालींनी ते बंद का केले नाही ? गांधीजींवर चित्रपट काढून त्यात त्यांना कथ्थक आणि भांगडा करताना दाखवलं तर मी माफ करणार नाही. मोहम्मद साहेबांवर चित्रपट काढून त्यांचे त्यात चरित्र दाखवण्याची कोणामध्ये हिंमत आहे का, असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही चार भाजपशासित राज्य राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवामध्ये चित्रपट रिलीज करण्यास बंदी घालण्यात आली होती. करणी सेना आणि इतर राजपूत संघटनांनी चित्रपटाचा विरोध कायम ठेवला. चित्रपटावर बंदी घालण्याची करणी सेनेची मागणी होती. संजय लीला भन्साळी यांनी चित्रपटात इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा करणी सेनेचा आरोप आहे. परंतु, भन्साळी यांनी हा आरोप पूर्वीच फेटाळला होता.

चित्रपट रिलीज होण्याच्या एक दिवस आधी राजपूत संघटनांनी देशातील अनेक भागात आंदोलन केले. काही ठिकाणी त्याला हिंसक वळणही लागले होते. आंदोलनकर्त्यांनी गुरूग्राम येथे स्कूलबसवर हल्ला केला होता. चित्रपटाबाबत जरी वाद होत असला तरी प्रेक्षकांकडून मोठे कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटाने रविवारी ८३ कोटींचा व्यवसाय केला. चित्रपट समीक्षकांच्या मते हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा आकडा पार करेल.